Wednesday 9 October 2013

'' व्हाय सो सिरीयस ???"

                   
                   
           अलीकडे दर चार पाच दिवसाआड किंवा एका ठरविक कालानंतर सोशल मेडीयावर ‘जोकर’ वर किंवा हिथ लेजर वर आधारित असलेली एकतरी पोस्ट दर्शन देत असते.  हा जोकर म्हणजे बॅटमॅन –  डार्क नाइट मधील (कु)प्रसिद्ध खलनायक . डार्क नाइट रिलीज होऊन पाच वर्षाहून अधिक काळ लोटला तरी प्रेक्षक जोकरला विसरायला तयार नाहीत . त्याचं प्रेम ते फेसबुक/ट्वीटर या माध्यमातून व्यक्त करत असतात. अस्मादिकही त्याच फ्यान क्लबचे सदस्य त्यामुळे आम्हालाही जोकर प्रेमाचे उमाळे अधून मधून येत असतात.आता काही जण म्हणतील की पाच वर्षापूर्वी येऊन गेलेल्या सिनेमातील एका पात्राविषयी आता म्हणजे एवढ्या उशिरा लिहिणं म्हणजे शिळ्या कढीलाच ऊत आणण्याचा प्रकारआणि तो आता करण्याची गरज काय. अर्थात हा आक्षेप जरी योग्य असला तरी माझ्यातला पंखा मला गप्प बसू देईना.मला लगेच जोकरचा तो सुप्रसिद्ध डायलॉग आठवला ‘व्हाय सो सिरीयस’. मी मनाशीच म्हटलं लिहून टाकूया .
                 
                   द डार्क नाइट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी तसेच समीक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले . स्वतः लेखक असलेल्या ख्रिस्तोफर नोलान ने आपला बंधू जोनाथन बरोबर लिहिलेली पटकथा आणी नोलानचं दिग्दर्शन अशी भट्टी जुळून आलेल्या ह्या ब्लॉकबस्टर चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धो धो यश मिळवलं. नोलानने सुपरहिरो मुव्हीजचा एक वेगळाच पैलू प्रेक्षकांना दाखवला. चित्रपटाचा नायक हा सुपरहिरो असूनही लोप्रोफाईल आणी खलनायक सुपेरीअर आणि मर्यादाहीन दाखवला किंबहुना खलनायकच हाच या सिनेमाचा युएसपी ठरला. या सिनेमातील सारी पात्रं देखील आपापल्या ठिकाणी उठावदार आहेत . जिम गॉर्डन , टू फेस हार्वी डेंट , रॅचेलआल्फ्रेड सारीच कॅरेक्टर्स दमदार आहेत . ख्रिस्तीअन बेलने केलेला बॅटमॅनही उत्तमच पण सगळ्यात उजवा ठरतो तो लेजरने साकारलेला जोकर.
           
                 या भूमिकेला हिथ लेजरने अगदी एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत पोहोचवले. निर्दयी,घातकी,थंड डोक्याचा,इंटेलिजंट सायको,पुढच्या क्षणाला काही करेल याचा काहिही नेम नसलेला,दुष्टपणा म्हणजे कलाकृती मानणारा असा हा जोकर. तर अशी जबरदस्त निगेटिव भूमिका निभावण्यासाठी तितक्याच ताकदवान अभिनेत्याची गरज होती आणि ही जबाबदारी लेजर ने अतिशय समर्थपणे निभावलीय .त्याने ह्या भूमिकेत असा काही जीव ओतला की अलीकडच्या काळातील हॉलीवुड मधील सर्वोत्तम खलनायक म्हणून ही भूमिका हॉलीवुडच्या इतिहासात अमर झालीय . या दमदार कामगिरीसाठी त्याला त्यावर्षीचं बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर साठीचं ऑस्कर अवार्ड ही मिळालं.त्याचबरोबर त्याच्या तोंडी असलेल्या डायलॉग्जलाही तुफान प्रसिद्धी मिळाली . मग तो “Why so serious ?असो किंवा Do I really look like a man with plan ?"असो. आणखी असे बरेच डायलॉग्ज आहेत ते मीम बनून अधून मधून आपल्या भेटीला येत असतातच. अर्थात चित्रपटाच्या यशात चित्रपटाच्या संवादाचाही सिंहाचा वाटा आहेच. सगळ्याच पात्रांच्या तोंडी असलेले संवाद अतिशय परिणामकारक आहेत.या संवादामुळेच चित्रपटाला एक वेगळीच गंभीर खोली प्राप्त होते.
                   
                एखाद्या अभिनेत्याच्या आयुष्यात त्याच्या पेक्षा त्याने केलेल्या भूमिकेचा उदो उदो होणे ही त्या अभिनेत्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि अशी सुखावून टाकणारी स्थिती खूपच कमी लोकांच्या वाटयाला येते. अशाच दिपवून टाकणाऱ्या यशाचा धनी होता हिथ लेजर .पण दुर्दैवाने या यशाचा आस्वाद घेण्यासाठी तो या जगात नव्हता. चित्रपट रिलीज होण्याच्या सहा महिन्यापूर्वीच प्रिस्काइब्ड मेडीकल ड्रग्जच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला.वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी मृत्यू येणं यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं.
                    
             लेजरचा मृत्यू हा अपघात की आत्महत्या याबद्दल निरनिराळी मते आहेत अधिकृत वैद्यकीय तज्ञांच्या मतानुसार लेजरचा  मृत्यू हा निरनिराळ्या प्रकाराची औषधे एकदम घेतल्यामुळे त्यांच्यात रिएक्शन होऊन झाला . त्याच्या जवळच्या मित्र आणी नातलग परिवाराच्या मते त्याच्या घटस्फोटामुळे तो व्यथित झाला होता पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलीचा ताबा आपल्याकडून जाणार यामुळे तो निराश होता .त्यामुळे त्याने निरनिराळ्या प्रकारची औषधे एकदम घेऊन आत्महत्या केली असही काही लोकांचं म्हणणं आहे .
                   
               त्याच्या मृत्यू विषयी आणखी एक गूढ कारण असल्याची चर्चाही होत असते .त्याच्या शुटिंग डायरीत असलेल्या नोंदींवरुन असं जाणवतं की डार्क नाईट साठी तो खूप मेहनत घेत होता .पराकोटीची नकारार्थी असलेल्या ह्या भूमिकेचा नकारार्थीपणा आपल्या अभिनयात उतरावा यासाठी तो स्वत:ला खोलीत बंद करून घेत असे. बहुदा त्याच्या व्यक्तिमत्वावर जोकरने आपला प्रभाव सोडला असावा आणी तो निराशेच्या गर्तेत रुतत गेला असावा असंही त्याच्या जवळच्या लोकांचं मत आहे. या मताला  आधार  म्हणजे डार्क नाईट च्या शुटिंग डायरीत शुटींग संपल्यानंतर  शेवटच्या पानावरत्याने खरडलेले दोन शब्द होते GOOD BYE .या शब्दांनी त्याच्या मृत्यू बद्दल असलेलं गुढ आणखीच गडद झालं.
              कारण काहिही असो एका उत्कृष्ट अभिनेत्याला जग मुकलं .हॉलीवूड मध्ये त्याच्या पूर्वी अनेकांनी जोकर साकारला आहे पण त्याच्या एवढी उंची कुणालाच गाठता आली नाही. जेव्हा जेव्हा हॉलीवूड मध्ये उत्कृष्ट खलनायक कोण असा प्रश्न येईल तेव्हा त्या यादीत लेजरने साकारलेला जोकरचं स्थान खूप वरचं असेल आणी त्याच्या चाहत्यांच्या हृदयातही त्याच स्थान अढळ राहील ...!!


                                                                                          धन्यवाद  

Wednesday 5 June 2013

‘द ओल्ड मॅन अॅण्ड द सी'


                  शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. इंग्रजी साठीच्या अभ्यासक्रमात जागतिक इंग्रजी साहित्यातील अनेक उत्तमोत्तम साहित्यकृतींचा समावेश आहे .इंग्रजी साहित्याच्या उगमापासून ते विविध साहित्यिक प्रवाह , विविध देशातील इंग्रजी भाषेतील साहित्यिक चळवळी आणि नाट्यरचना यांचा समग्र अभ्यास या साऱ्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे .
                      एम.ए.इंग्रजी च्या दुसऱ्या वर्षाच्या अभ्यास क्रमात अर्नेस्ट हेमिंग्वेच्या ‘द ओल्ड मॅन अॅण्ड द सी या कादंबरीचा समावेश आहे .अर्नेस्ट हेमिंग्वे अमेरिकन साहित्यविश्वातील एक महान लेखक . हेमिंग्वे मुळातच एक बंडखोर लेखक होता . तो जेथे वाढला, शिकला त्या शहरात म्हणजे ओक पार्क येथे अतिशय सनातनी वातावरण होते . बोलण्यावर , वागण्यावर , असलेल्या सामाजिक बंधनांच्या अतिरेकामुळे त्याच्या स्वभावात बंडखोरी आली असावी असे अभ्यासक मानतात . या बंडखोर अभिव्यक्तीचा उद्रेक त्याच्या लिखाणातून होत असे . शाळेच्या नियतकालीका मधूनही तो अतिशय बंडखोर पद्धतीचं लिखाण करीत असे . साहस , बंडखोरी , समाजाच्या नियमांना आव्हान देण्याची वृत्ती याचं दर्शन नेहमी त्याच्या साहित्यातून होत असे .
             त्याची द ओल्ड मॅन अॅण्ड द सी’ अभ्यासाच्या निमित्ताने वाचनात आली आणि खूपच भावली . मानव आणि निसर्ग यांच्यातल्या संघर्षाची ही कहाणी आहे . म्हातारा कोळी सँटीएगो आणि आणि त्याला हरवू पाहणारा निसर्ग यांच्यातला सामना हेमिंग्वेने अतिशय नेटक्या शब्दात टिपलाय .
                    या कादंबरीचा नायक आहे म्हातारा कोळी सँटीएगो . तो अतिशय विपण्ण अवस्थेत दिवस काढतोय. ना खायला अन्न ना अंगावर धड कपडे अशा कमालीच्या दरिद्री अवस्थेत एका झोपडीत राहतोय . त्याचं शरीर आता थकलयं . सर्व अवयव आता अशक्त झालेत . गेल्या ८४ दिवसात त्याला एकही मासा मिळालेला नाही . तरीही अश्या या टोकाच्या नकारार्थी परिस्थितीतही तो कमालीचा आशावादी आहे. आपली नाव सागरात लोटायला तो पंच्याऐंशीव्या दिवशीही तितकाच उत्सुक आहे . अश्या या म्हाताऱ्या कोळ्याचं कॅरेक्टर लेखकानं कोणतही पाल्हाळ न लावता व्यक्त केलंय . अर्थात ही कादंबरीच छोटी असल्यामुळे सारा मॅटर अतिशय इकॉनॉमिक.

               मासेमारीच्या या कामात त्याला मदत करणारा त्याचा सहाय्यक म्हणजे मॅनोलीन हा एक छोटा मुलगा . तो वयाच्या पाचव्या वर्षापासून सँटीएगोच्या सहाय्यकाचं काम करत होता . पण आता तो सँटीएगोबरोबर काम करत नाही . मॅनोलीन च्या वडिलांनी त्याला सँटीएगोबरोबर मासेमारीला जाण्यास मनाई केली आहे . तरीही मॅनोलीन सँटीएगोला खूप मदत करतो . छोट्या मॅनोलीनचा सँटीएगोवर खूप जीव आहे .त्याच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था , मासेमारीसाठी लागणारे माशांचं खाद्य , इथपासून त्याची बोट समुद्रात लोटून देण्यापर्यंतची मदत मॅनोलीन करतो . सँटीएगोला तर मॅनोलीन म्हणजे त्याच्या मुलाप्रमाणेच आहे . कथाक्रमानुसार या दोघांमधला ऋणानुबंध आपल्यापुढे येत राहतो .
               मॅनोलीनच्या मदतीवर सँटीएगो आपली बोट समुद्रात लोटतो आणि इथून खऱ्या खेळाला सुरवात होते . बऱ्याच प्रयत्नानंतर सँटीएगोच्या गळाला एक मासा लागतो आणि विशाल सागराच्या अथांग पार्श्वभूमीवर एक रस्सीखेच सुरु होते. सँटीएगोच्या गळाला लागलेला मासा हा प्रचंड आकाराचा म्हणजे त्याच्या नावेपेक्षा ही मोठा असतो . हा प्रचंड शक्तिशाली मासा सँटीएगोच्या प्रयत्नांना अजिबात दाद देत नाही . माशामधील आणि सँटीएगोमधील ही लढाई अडीच दिवस चालते. अडीच दिवस चाललेल्या या माइंडगेममध्ये म्हाताऱ्या सँटीएगोची हालत अतिशय बिकट होते . सँटीएगोचं शरीर आणि मन दोन्हीही अक्षरशः तार तार होऊन जातात. सँटीएगो आणि मासा दोघांसाठी ही लढाई अस्तीत्वाची असते. आणि दोघेही ती अतिशय प्राणपणाने लढतात . ही लढाई शेवटी सँटीएगो आपल्या मनोनिग्रहाच्या जोरावर जिंकतो . त्याची शिकार बोटीच्या कडेला बांधतो आणि त्याची नाव हाकारतो . पण हाय रे दुर्दैव ! ते येथेही त्याची पाठ सोडत नाही . त्याने शिकार केलेल्या माशाच्या रक्ताच्या गंधामुळे शार्क मासे त्याच्या शिकारीकडे आकर्षित होतात . सँटीएगो त्यांचा अगदी कडवा प्रतिकार करतो पण तो त्याच्या माशाला शार्कपासून वाचवू शकत नाही.  ते त्याच्या शिकारीचे लचके तोडून सारा मांसल भाग खाऊन टाकतात . शिल्लक उरते ते फक्त माशाचे डोके आणि शेपटीकडील भाग . एवढीच कमाई घेऊन गलीतगात्र झालेला सँटीएगो किनाऱ्यावर परततो .

              भर समुद्रात रंगलेला आशा निराशेचा हा खेळ , लेखकाने सँटीएगोच्या स्वगतामधून व्यक्त केलाय . सँटीएगोची जिद्द ,त्याची मासेमारी करण्यामागची गरज आणि नैतिक बैठक , त्याचं ‘नेवर से डाय अॅटीट्युड’ हे सारे पैलू कथानकातून आपल्या समोर उलगडत जातात .

               कादंबरी छोटी आहे पण वाचकाला अस्वस्थ करून सोडते .समीक्षकांच्या मते ह्या कादंबरीच्या कथानकामागे लपलेलं स्पिरीच्युअल मिनिंग या कादंबरीला विशेष बनवतं. ही कादंबरी आहे तशी जुनी म्हणजे सन १९५२ साली प्रकाशित झाली व कादंबरी खूप गाजली . अमेरिकन साहित्यातील एक क्लासिक म्हणून ती ओळखली जाते . या कादंबरीमुळे हेमिंग्वेला लोकप्रियता मिळाली . त्याला या कादंबरीसाठी मानाचा पुलित्झर पुरस्कारही मिळाला . यथावकाश साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कारही मिळाला . जगातील अनेक भाषांमध्ये या कादंबरीचा अनुवाद झालाय . मराठीमध्ये पु.लं. देशपांडे यांनी या कादंबरीचा स्वैर अनुवाद यांनी केलाय . तो ‘एका कोळियाने’ या नावाने प्रसिध्द आहे . पु.लं. नि केलेला अनुवादही मास्टरपीस आहे .मिळाल्यास जरूर वाचा .

          

 

                                                                     धन्यवाद .

                     

Sunday 5 May 2013

एक येडचाप अभिनेता ..


 
             रॉबर्ट डॉवनी ज्यू . माझ्या आवडत्या हॉलीवूड अभिनेत्यांपैकी एक. अर्थात जाणकारांच्या लेखी ही आवड अतिशय डीसेंट नसली तरी तो मला आवडतो . स्टबर्न , इगोस्टिक , आणि हायली इंटलेक्चुअल बास्टर्ड आणि तरीही या सर्वातून डोकावणारा एक फिलॅनथ्रोपिकल अॅप्रोच अशा प्रकारच्या भूमिका तो अगदी परफेक्टली रंगवतो किंबहुना जगतो म्हणायला काहीच हरकत नाही .

     शेरलॉक होम्स मधील होम्स किंवा आयर्नमॅन मधला मल्टी बिलीनेअर इसेन्ट्रीक जीनियस टोनी स्टार्क या दोन्ही व्यक्तिरेखा ह्या मुळातच अतिशय बुद्धिमान आणि तेज आहेत या दोन्हीही भुमिकांवर डावनी ज्यू. ने आपली छाप सोडली आहे .

          . शेरलॉक होम्स हे सर आर्थर कॉनन डॉयल यांचे अजरामर साहित्यिक पात्र . आणि अतिशय बुद्धीमान व चपळ असणारा आणि अतिशय तठस्थ किंवा अतिशय तर्कशुद्ध दृष्टीकोन ठेवून काम करणारा डिटेक्टिव शेरलॉक होम्स तर त्याने जिंदा केलाय . अर्थात त्यात दिग्दर्शकाचेही श्रेय आहेच पण त्याने केलेला होम्स हा अल्टीमेटच .

                    अतिशय वादग्रस्त पूर्वाआयुष्य जगलेल्या डॉवनी ज्यू.ला शेरलॉक होम्स आणि आयर्नमॅन मूवी सेरीजनी हात दिला आणि पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आणून उभे केले.  त्याची यापूर्वीची कारकीर्द ही तशी अतिशय उल्लेखनीय नव्हती आणि वाईटही नव्हती  पण ह्या दोन्ही मुव्हीजनी चित्र पालटून टाकले . आणि त्याला हॉलीवूड मधील अव्वल नायकांच्या श्रेणीत आणून बसवले .

            मुळात डॉवनी ज्यू.चा जन्म हा एका चित्रपट क्षेत्राशी संबधित असलेल्या घरी झाला . त्याचे वडील डॉवनी सिनिअर. हे  अभिनेता ,दिग्दर्शक , पटकथाकर , छायाचीत्रकार अश्या वेगवेगळ्या क्षेत्रातून काम करत होते . त्याची आईही याच क्षेत्राशी संबधित होती . त्यामुळे सिनेमाचं बाळकडू हे त्याला अगदी लहानपानापासूनच मिळालं .त्याने स्वतःही वयाच्या पाचव्या वर्षी आपली पहिली भूमिका केली . पण त्याला त्याच्या घरातून चांगले संस्कार मिळू शकले नाहीत . डॉवनी सिनिअरना ड्रग्ज सेवन करण्याचे व्यसन होते . त्यांच्यामुळे ज्यूनिअरही त्या व्यसनाला बळी पडला तेही जरा लवकरच म्हणजे वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी . या व्यसनातून तो बाहेर पडण्याचा पर्यंत करत होता पण यश येत नव्हते .या व्यसनामुळे त्याच्या खासगी जीवनातही खूप उलाथापालथी झाल्या . ड्रग्ज सेवनाबद्दल जेलवारी ,  कोर्टाने फर्मावलेल्या शिक्षांमुळे घडलेल्या व्यसनमुक्ती शिबिरांच्या फेरया ह्या साऱ्या गोष्टीमुळे त्याचे कौटुंबीक जीवन अतिशय अस्थिर होते . त्याच्या ह्या ‘एक पाव जेल मे’ टाइप जीवनामुळे त्याचा घटस्फोट झाला .  पत्नी मुलाला घेऊन निघून गेली . पण त्यानंतर त्याच्या जीवनात आलेल्या नवीन पत्नीने त्याला व्यसनातून बाहेर पडायला मदत केली ; आणि त्याच्या करिअरला एक चांगला स्विंग मिळाला तो आयर्नमॅनच्या रूपाने . या दणदणीत व्यावसायिक यशाने त्याचा पुढचा मार्ग यशस्वी बनवला . अर्थात त्याचं व्यक्तिगत आयुष्य हे खूप निराशाजनक असलं तरी त्याच्यात असलेल्या गुणवत्तेमुळे त्याने खूपच मोठी व्यावसायिक मजल मारली .

                          तो काही खूप ग्रेट वगैरे आहे असं नाही किंवा त्याच्यापासून खूप काही प्रेरणा वगैरे मिळते असंही काही नाही . मलाही त्याच्याविषयी खुप माहिती होती असं नाही .पण त्याची शैली आणि त्याने ज्यापद्धतीने शेरलॉक होम्स , आणि टोनी स्टार्क वठवला त्यामुळे त्याच्याविषयी एक कुतूहल निर्माण झालं . आणि त्यातून त्याच्या विषयी धुंडाळा घेतला . विकीपेडिया वर त्याच्या विषयी भरपूर ऐवज मिळाला .IMDB वरही माहिती मिळाली . तीच माहिती संकलित करून या पोस्ट मध्ये मांडलीय .

               तो कितीही बेदरकर आणि बेफिकीर असला तरी त्याचे चाहते मात्र त्याच्या नवीन फिल्म्सची सदैव प्रतीक्षा करत असतात आणि त्यातच त्याचं यश सामावलेलं आहे . शेवटी एका कलाकाराला आणखी काय हवं असतं .

 

 

 

                                                                   धन्यवाद

 

Monday 15 April 2013

‘ इन्फर्णो च्या निमित्ताने... '




   
           डॅन ब्राऊनच्या पहिल्या दोन कादंबऱ्या म्हणजे ‘द दा विन्ची कोड ‘ आणि ‘ एंजेल्स एंड डीमन्स’ ह्या युरोप मधील मध्यायुगपासून चालत आलेल्या बुद्धिप्रामाण्य आणि श्रद्धा ह्यातल्या संघर्षावर आधारित असलेल्या प्रसिद्ध कादंबऱ्या. ह्या कादंबऱ्या जगभरातल्या वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या . साय –फाय , सस्पेन्स थ्रिलर या पठडीतल्या असलेल्या ह्या कादंबऱ्या ह्या रहस्य आणि रोमांच यांनी ठासून भरल्या आहेत. एंजेल्स एंड डेमॉंन्स’ ही तर एपीटोम ऑफ थ्रीलच. अगदी हातात घेतल्यावर संपवल्याशिवाय ठेवावीशी वाटत नाही . ह्या दोन्ही कादंबर्यांवर चित्रपटही निघाले व दोन्हीही उत्तम चालले. अर्थात दोन्ही चित्रपटावर एक एक स्वतंत्र पोस्ट होऊ शकते  .
                      
                     सस्पेन्सचा हा वारसा ब्राऊनने रहस्यकथांचा बादशहा असलेल्या सिडने शेल्टन कडून घेतलाय. सिडने शेल्टनच्या कादंबऱ्या वाचूनच आपण रहस्यकथांकडे वळलो असे ब्राऊनने एके ठिकाणी नमूद केलेय.  ब्राऊनच्या कादंबऱ्यात शृंखलेत गुंफलेली रहस्ये ही कोडी , नकाशे , सायफर्स , पझल्स अश्या निरनिराळ्या स्वरुपात आपल्या समोर येत रहातात . ह्या अनोख्या योजना प्रकाराचं श्रेय डॅन आपल्या वडिलांना देतो . ख्रिसमसच्या भेटवस्तूमध्ये ह्याचं मूळ दडलेलं आहे . त्याच्या ख्रिसमसच्या भेटवस्तू त्याला सहजासहजी मिळत नसत त्याला व त्याच्या भावंडाना त्या कोडी सोडवून , नकाशे वापरून शोधाव्या लागत असत . ह्या साऱ्या प्रकारचा प्रभाव त्याच्या लिखाणावर जाणवतो . आणि त्याच्या कादंबरीतील नायकलाही अशाच प्रकारे रहस्यांची उलगड करावी लागते .
                   
               युरोपिअन धर्मसंस्था आणि त्याभोवती असणारे धर्माचे ठेकेदार , सत्तेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी खेळणे जाणारे गलिच्छ राजकारण , सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी आणि ह्या साऱ्या पार्श्वभूमीवर गुंफलेली एक खिळवून ठेवणारी कथा आणि  ह्या सर्व गदारोळात अनपेक्षितरीत्या अडकलेला हॉवर्ड विद्यापीठातला ‘ सिम्बोलोजिस्ट ‘ प्रोफेसर रोबर्ट ‌लॅंगडन . हा इतका सगळा मसाला असल्यावर त्याच्या कादंबर्यांवर जगभरातल्या वाचकांच्या उड्या न पडतील तरच नवल . अर्थात दोन्ही कादंबऱ्या फिक्शनल आहेत त्यामुळे त्यातले धर्म संस्थांच्या अंतर्गत राजकारणाचे वर्णन हे कितपत ट्रु आणि कितपत फिक्शनल हे फक्त ब्राऊनच जाने .पण यात वर्णन केलेले ऐतिहासिक संदर्भ व संघटना ह्या सोळा आणे सच आहेत असे त्याने प्रस्तावनेत स्पष्टपणे नमूद केलंय . फॅक्ट आणि फिक्शनचा थ्रीलिंग मिलाफ लेखकाने घडवून आणलाय .
                
                    धर्म म्हणजे बहुसंख्य लोकांच्या आस्था आणि श्रद्धेचा विषय , आणि अश्या संवेदनशील विषयांवर निव्वळ एखादा शब्द जरी उच्चारला तरी ह्या संस्थांचे प्रतिनिधी समोरच्या व्यक्तीवर अक्षरशः तुटून पडतात आणि तरीही ब्राऊनने ख्रिश्चन समाजाची सर्वोच्च संस्था म्हणजे ‘वॅटीकन चर्च आणि चर्चमधील राजकारण ह्या विषयांवर दोन कादंबऱ्या लिहीण्याच धारिष्ट्य दाखवलं त्याचा परिणाम म्हणून त्याच्यावर टीकेचा भडीमार झाला .चर्चकडूनही जहरी टीका झाली पण बुद्धिवादी वाचकांकडून स्वागतही झाले . धर्मसंस्थेला केंद्रस्थानी ठेऊन अश्या प्रकारची साहित्य निर्मिती करणे म्हणजे धाडशी प्रयोग मानावा लागेल . तरीही ब्राऊनच्या मते त्याचे साहित्य म्हणजे मनोरंजनाबरोबर आत्मपरिक्षण करायला लावणारे आहे . धर्माचा खरा अर्थ न समजून घेता केवळ तकलादू आणि आणि सोयीस्कर अर्थ लावणाऱ्या धर्माच्या तथाकथित ठेकेदारांच समर्पक वर्णन ब्राऊनने या दोन्ही कादंबर्यात केलंय . ज्यांना वाचनाची आवड आहे , आणि रहस्य कथा ज्यांना आवडतात त्यांनी ही पुस्तके  जरूर वाचावीत .मराठीतही भाषांतरे उपलब्ध आहेत ..
                
                   ह्या विषयावर पोस्ट लिहीण्याच कारण म्हणजे डॅन ब्राऊनची नवी कादंबरी मे महिन्यात प्रकाशित होतेय . ‘द इन्फर्णो ‘ असं नाव असलेल्या ह्या कादंबरीच्या प्रकाशनाकडे वाचक डोळे लावून बसलेत . मीही त्यातलाच एक वाचक . जगभरातल्या नेटीजन्समध्ये इन्फर्णो विषयी प्रचंड कुतूहल आहे . वाचकांचे निरनिराळे ब्लॉग्स , फोरम्स ह्यावर चर्चा झडताएत. एकूणच वाचक जगतात इन्फर्णो विषयी खूपच बझ् आहे आणि ब्राऊनचा लौकिक पाहता ही कादंबरीही बेस्टसेलर ठरेल यात काही शंकाच नाही .





                                                                       धन्यवाद.