Wednesday 5 June 2013

‘द ओल्ड मॅन अॅण्ड द सी'


                  शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. इंग्रजी साठीच्या अभ्यासक्रमात जागतिक इंग्रजी साहित्यातील अनेक उत्तमोत्तम साहित्यकृतींचा समावेश आहे .इंग्रजी साहित्याच्या उगमापासून ते विविध साहित्यिक प्रवाह , विविध देशातील इंग्रजी भाषेतील साहित्यिक चळवळी आणि नाट्यरचना यांचा समग्र अभ्यास या साऱ्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे .
                      एम.ए.इंग्रजी च्या दुसऱ्या वर्षाच्या अभ्यास क्रमात अर्नेस्ट हेमिंग्वेच्या ‘द ओल्ड मॅन अॅण्ड द सी या कादंबरीचा समावेश आहे .अर्नेस्ट हेमिंग्वे अमेरिकन साहित्यविश्वातील एक महान लेखक . हेमिंग्वे मुळातच एक बंडखोर लेखक होता . तो जेथे वाढला, शिकला त्या शहरात म्हणजे ओक पार्क येथे अतिशय सनातनी वातावरण होते . बोलण्यावर , वागण्यावर , असलेल्या सामाजिक बंधनांच्या अतिरेकामुळे त्याच्या स्वभावात बंडखोरी आली असावी असे अभ्यासक मानतात . या बंडखोर अभिव्यक्तीचा उद्रेक त्याच्या लिखाणातून होत असे . शाळेच्या नियतकालीका मधूनही तो अतिशय बंडखोर पद्धतीचं लिखाण करीत असे . साहस , बंडखोरी , समाजाच्या नियमांना आव्हान देण्याची वृत्ती याचं दर्शन नेहमी त्याच्या साहित्यातून होत असे .
             त्याची द ओल्ड मॅन अॅण्ड द सी’ अभ्यासाच्या निमित्ताने वाचनात आली आणि खूपच भावली . मानव आणि निसर्ग यांच्यातल्या संघर्षाची ही कहाणी आहे . म्हातारा कोळी सँटीएगो आणि आणि त्याला हरवू पाहणारा निसर्ग यांच्यातला सामना हेमिंग्वेने अतिशय नेटक्या शब्दात टिपलाय .
                    या कादंबरीचा नायक आहे म्हातारा कोळी सँटीएगो . तो अतिशय विपण्ण अवस्थेत दिवस काढतोय. ना खायला अन्न ना अंगावर धड कपडे अशा कमालीच्या दरिद्री अवस्थेत एका झोपडीत राहतोय . त्याचं शरीर आता थकलयं . सर्व अवयव आता अशक्त झालेत . गेल्या ८४ दिवसात त्याला एकही मासा मिळालेला नाही . तरीही अश्या या टोकाच्या नकारार्थी परिस्थितीतही तो कमालीचा आशावादी आहे. आपली नाव सागरात लोटायला तो पंच्याऐंशीव्या दिवशीही तितकाच उत्सुक आहे . अश्या या म्हाताऱ्या कोळ्याचं कॅरेक्टर लेखकानं कोणतही पाल्हाळ न लावता व्यक्त केलंय . अर्थात ही कादंबरीच छोटी असल्यामुळे सारा मॅटर अतिशय इकॉनॉमिक.

               मासेमारीच्या या कामात त्याला मदत करणारा त्याचा सहाय्यक म्हणजे मॅनोलीन हा एक छोटा मुलगा . तो वयाच्या पाचव्या वर्षापासून सँटीएगोच्या सहाय्यकाचं काम करत होता . पण आता तो सँटीएगोबरोबर काम करत नाही . मॅनोलीन च्या वडिलांनी त्याला सँटीएगोबरोबर मासेमारीला जाण्यास मनाई केली आहे . तरीही मॅनोलीन सँटीएगोला खूप मदत करतो . छोट्या मॅनोलीनचा सँटीएगोवर खूप जीव आहे .त्याच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था , मासेमारीसाठी लागणारे माशांचं खाद्य , इथपासून त्याची बोट समुद्रात लोटून देण्यापर्यंतची मदत मॅनोलीन करतो . सँटीएगोला तर मॅनोलीन म्हणजे त्याच्या मुलाप्रमाणेच आहे . कथाक्रमानुसार या दोघांमधला ऋणानुबंध आपल्यापुढे येत राहतो .
               मॅनोलीनच्या मदतीवर सँटीएगो आपली बोट समुद्रात लोटतो आणि इथून खऱ्या खेळाला सुरवात होते . बऱ्याच प्रयत्नानंतर सँटीएगोच्या गळाला एक मासा लागतो आणि विशाल सागराच्या अथांग पार्श्वभूमीवर एक रस्सीखेच सुरु होते. सँटीएगोच्या गळाला लागलेला मासा हा प्रचंड आकाराचा म्हणजे त्याच्या नावेपेक्षा ही मोठा असतो . हा प्रचंड शक्तिशाली मासा सँटीएगोच्या प्रयत्नांना अजिबात दाद देत नाही . माशामधील आणि सँटीएगोमधील ही लढाई अडीच दिवस चालते. अडीच दिवस चाललेल्या या माइंडगेममध्ये म्हाताऱ्या सँटीएगोची हालत अतिशय बिकट होते . सँटीएगोचं शरीर आणि मन दोन्हीही अक्षरशः तार तार होऊन जातात. सँटीएगो आणि मासा दोघांसाठी ही लढाई अस्तीत्वाची असते. आणि दोघेही ती अतिशय प्राणपणाने लढतात . ही लढाई शेवटी सँटीएगो आपल्या मनोनिग्रहाच्या जोरावर जिंकतो . त्याची शिकार बोटीच्या कडेला बांधतो आणि त्याची नाव हाकारतो . पण हाय रे दुर्दैव ! ते येथेही त्याची पाठ सोडत नाही . त्याने शिकार केलेल्या माशाच्या रक्ताच्या गंधामुळे शार्क मासे त्याच्या शिकारीकडे आकर्षित होतात . सँटीएगो त्यांचा अगदी कडवा प्रतिकार करतो पण तो त्याच्या माशाला शार्कपासून वाचवू शकत नाही.  ते त्याच्या शिकारीचे लचके तोडून सारा मांसल भाग खाऊन टाकतात . शिल्लक उरते ते फक्त माशाचे डोके आणि शेपटीकडील भाग . एवढीच कमाई घेऊन गलीतगात्र झालेला सँटीएगो किनाऱ्यावर परततो .

              भर समुद्रात रंगलेला आशा निराशेचा हा खेळ , लेखकाने सँटीएगोच्या स्वगतामधून व्यक्त केलाय . सँटीएगोची जिद्द ,त्याची मासेमारी करण्यामागची गरज आणि नैतिक बैठक , त्याचं ‘नेवर से डाय अॅटीट्युड’ हे सारे पैलू कथानकातून आपल्या समोर उलगडत जातात .

               कादंबरी छोटी आहे पण वाचकाला अस्वस्थ करून सोडते .समीक्षकांच्या मते ह्या कादंबरीच्या कथानकामागे लपलेलं स्पिरीच्युअल मिनिंग या कादंबरीला विशेष बनवतं. ही कादंबरी आहे तशी जुनी म्हणजे सन १९५२ साली प्रकाशित झाली व कादंबरी खूप गाजली . अमेरिकन साहित्यातील एक क्लासिक म्हणून ती ओळखली जाते . या कादंबरीमुळे हेमिंग्वेला लोकप्रियता मिळाली . त्याला या कादंबरीसाठी मानाचा पुलित्झर पुरस्कारही मिळाला . यथावकाश साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कारही मिळाला . जगातील अनेक भाषांमध्ये या कादंबरीचा अनुवाद झालाय . मराठीमध्ये पु.लं. देशपांडे यांनी या कादंबरीचा स्वैर अनुवाद यांनी केलाय . तो ‘एका कोळियाने’ या नावाने प्रसिध्द आहे . पु.लं. नि केलेला अनुवादही मास्टरपीस आहे .मिळाल्यास जरूर वाचा .

          

 

                                                                     धन्यवाद .