Thursday 11 April 2013

‘पहिली पोस्ट’


        पहिली पोस्ट        

                दिसामाजी काहीतरी लिहित जावे ..प्रसंगी अखंडित वाचित जावे .... समर्थांनी दिलेला हा उपदेश हा असंख्य हौश्या , नवश्या आणि गवश्याना लिहिण्यास बळ देत आला आहे  . येथे समर्थांचा दाखला देण्याच प्रयोजन एवढ्यासाठीच कारण हयाच उपदेशाने प्रेरित होऊन अस्मास्दिकांनी ब्लॉग सुरु धाडस केले आहे . वाचनाच्या आघाडीवर मी अगदीच तिस्मारखान नसलो तरी एक बऱ्यापैकी वाचक आहे. पण ब्लॉगिंग म्हणजे अगदीच नॉट माय कप ऑफ टी असे वाटत होते आणि आधीच संख्येने शेकड्याने असलेल्या ब्लॉगच्या भाऊगर्दीत कोण आपल्या ब्लॉगला भेट देणार अशी भावनाही कुठेतरी खुपत होती .

    आपणही लिहावे असं वाटणे  म्हणजे शालेय जीवनात केलेल्या तसेच अद्यापही चालू असलेल्या अवांतर वाचनाचे फलित असावे असे मला वाटते . आणि ज्याला कुणाला वाचनाची थोडीफार आवड आहे त्या सर्वामध्येच अशा प्रकारचा किडा (अंतरप्रेरणा) वळवळत असतोच असतो त्यातलाच मीही एक. त्या अंतरप्रेरणेला (पक्षी- किड्याला) थोडासा स्कोप मिळावा म्हणून हे धाडस केले .  तत्पूर्वी आमची धाव म्हणजे फेसबुक वरची एखादी पोस्ट अथवा एखाधी कमेंट .

       ब्लॉग चालू करण्याच्या इच्छेला बळ मिळण्याचे कारण म्हणजे मराठी ब्लॉगविश्वात होत असलेली प्रचंड वाढ होय .हल्ली आंतरजालावर मराठी ब्लॉगर्सची अक्षरशः धूम आहे . मराठी ब्लॉगविश्व इतके विविध आणि विस्तारले आहे यावर विश्वासच बसत नाही . अगदी ‘मनाचे श्लोक’ पासून शेक्सपिअरच्या ‘द टेम्पटेस्ट’ आणि मराठी पुरणपोळी पासून इटलीच्या पिझ्झ्यापर्यंत , कोकणच्या किनाऱ्यावर केलेल्या भटकंतीपासून अगदी युरोप अमेरिकेत केलेल्या सहलींच्या प्रवासवर्णनापर्यंत , अहिराणी भाषेतील कवितांपासून ते मालवणी भाषेतल्या दशवातारचे परीक्षण ह्या आणि अक्षरशः कोणत्याही विषयावर मराठी ब्लऑगु ,ब्लौगिनी ( बंधू- भगिनी ) लिहित असतात.  अश्या या ब्लॉगिंगच्या दुनियेत विविध विषयांवरचे शेकडो ब्लॉग आहेत . अगदी ब्लॉग कसा चालू करावा पासून तो अधिकाधिक लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवावा या प्रकारचे मार्गदर्शक ब्लॉगही येथे आहेत .

  कोणीही यावे आणि आपल्याला काय वाटते ते मुक्तपणे मांडावे . येथे कुठल्याही प्रकारची बंधने नाहीत की आडकाठी नाही फक्त तुमच्या डोक्यात लिखाणाचा किडा वळवळत असेल तर ह्या दुनियेत तुमचे स्वागतच आहे  तर अश्या ह्या ब्लॉगिंगच्या ओपन सोर्स दुनियेत आपणही आपल्या कल्पनेचे वारू का उधळू नयेत ह्या विचाराने हा लेखनप्रपंच सुरु करण्याचे धाडस केले .

 लिहावेसे वाटणे आणि लिहिणे यात खूप मोठे अंतर आहे . हे ही पहिली पोस्ट लिहिताना अनुभवतोय . असो काही असेना ही पहिली पोस्ट तरी पूर्ण झाली . आज मी ऑफिशियली ब्लॉगर झालोय आणि मी ही पहिली पोस्ट पूर्ण करू शकलो हा आनंदही काही छोटा नाही ... !

 वि. सु . -मराठी दर्जेदार ब्लॉग वाचायचे असतील तर http://marathiblogs.net/  या वेबपेजला अवश्य भेट द्या . येथे विविध विषयांवरच्या ब्लॉग्सची इंडेक्स तुम्हाला पाहायला मिळेल .

                                                            धन्यवाद ... !!

 

         

 

   

 

No comments:

Post a Comment