Wednesday 9 October 2013

'' व्हाय सो सिरीयस ???"

                   
                   
           अलीकडे दर चार पाच दिवसाआड किंवा एका ठरविक कालानंतर सोशल मेडीयावर ‘जोकर’ वर किंवा हिथ लेजर वर आधारित असलेली एकतरी पोस्ट दर्शन देत असते.  हा जोकर म्हणजे बॅटमॅन –  डार्क नाइट मधील (कु)प्रसिद्ध खलनायक . डार्क नाइट रिलीज होऊन पाच वर्षाहून अधिक काळ लोटला तरी प्रेक्षक जोकरला विसरायला तयार नाहीत . त्याचं प्रेम ते फेसबुक/ट्वीटर या माध्यमातून व्यक्त करत असतात. अस्मादिकही त्याच फ्यान क्लबचे सदस्य त्यामुळे आम्हालाही जोकर प्रेमाचे उमाळे अधून मधून येत असतात.आता काही जण म्हणतील की पाच वर्षापूर्वी येऊन गेलेल्या सिनेमातील एका पात्राविषयी आता म्हणजे एवढ्या उशिरा लिहिणं म्हणजे शिळ्या कढीलाच ऊत आणण्याचा प्रकारआणि तो आता करण्याची गरज काय. अर्थात हा आक्षेप जरी योग्य असला तरी माझ्यातला पंखा मला गप्प बसू देईना.मला लगेच जोकरचा तो सुप्रसिद्ध डायलॉग आठवला ‘व्हाय सो सिरीयस’. मी मनाशीच म्हटलं लिहून टाकूया .
                 
                   द डार्क नाइट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी तसेच समीक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले . स्वतः लेखक असलेल्या ख्रिस्तोफर नोलान ने आपला बंधू जोनाथन बरोबर लिहिलेली पटकथा आणी नोलानचं दिग्दर्शन अशी भट्टी जुळून आलेल्या ह्या ब्लॉकबस्टर चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धो धो यश मिळवलं. नोलानने सुपरहिरो मुव्हीजचा एक वेगळाच पैलू प्रेक्षकांना दाखवला. चित्रपटाचा नायक हा सुपरहिरो असूनही लोप्रोफाईल आणी खलनायक सुपेरीअर आणि मर्यादाहीन दाखवला किंबहुना खलनायकच हाच या सिनेमाचा युएसपी ठरला. या सिनेमातील सारी पात्रं देखील आपापल्या ठिकाणी उठावदार आहेत . जिम गॉर्डन , टू फेस हार्वी डेंट , रॅचेलआल्फ्रेड सारीच कॅरेक्टर्स दमदार आहेत . ख्रिस्तीअन बेलने केलेला बॅटमॅनही उत्तमच पण सगळ्यात उजवा ठरतो तो लेजरने साकारलेला जोकर.
           
                 या भूमिकेला हिथ लेजरने अगदी एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत पोहोचवले. निर्दयी,घातकी,थंड डोक्याचा,इंटेलिजंट सायको,पुढच्या क्षणाला काही करेल याचा काहिही नेम नसलेला,दुष्टपणा म्हणजे कलाकृती मानणारा असा हा जोकर. तर अशी जबरदस्त निगेटिव भूमिका निभावण्यासाठी तितक्याच ताकदवान अभिनेत्याची गरज होती आणि ही जबाबदारी लेजर ने अतिशय समर्थपणे निभावलीय .त्याने ह्या भूमिकेत असा काही जीव ओतला की अलीकडच्या काळातील हॉलीवुड मधील सर्वोत्तम खलनायक म्हणून ही भूमिका हॉलीवुडच्या इतिहासात अमर झालीय . या दमदार कामगिरीसाठी त्याला त्यावर्षीचं बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर साठीचं ऑस्कर अवार्ड ही मिळालं.त्याचबरोबर त्याच्या तोंडी असलेल्या डायलॉग्जलाही तुफान प्रसिद्धी मिळाली . मग तो “Why so serious ?असो किंवा Do I really look like a man with plan ?"असो. आणखी असे बरेच डायलॉग्ज आहेत ते मीम बनून अधून मधून आपल्या भेटीला येत असतातच. अर्थात चित्रपटाच्या यशात चित्रपटाच्या संवादाचाही सिंहाचा वाटा आहेच. सगळ्याच पात्रांच्या तोंडी असलेले संवाद अतिशय परिणामकारक आहेत.या संवादामुळेच चित्रपटाला एक वेगळीच गंभीर खोली प्राप्त होते.
                   
                एखाद्या अभिनेत्याच्या आयुष्यात त्याच्या पेक्षा त्याने केलेल्या भूमिकेचा उदो उदो होणे ही त्या अभिनेत्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि अशी सुखावून टाकणारी स्थिती खूपच कमी लोकांच्या वाटयाला येते. अशाच दिपवून टाकणाऱ्या यशाचा धनी होता हिथ लेजर .पण दुर्दैवाने या यशाचा आस्वाद घेण्यासाठी तो या जगात नव्हता. चित्रपट रिलीज होण्याच्या सहा महिन्यापूर्वीच प्रिस्काइब्ड मेडीकल ड्रग्जच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला.वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी मृत्यू येणं यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं.
                    
             लेजरचा मृत्यू हा अपघात की आत्महत्या याबद्दल निरनिराळी मते आहेत अधिकृत वैद्यकीय तज्ञांच्या मतानुसार लेजरचा  मृत्यू हा निरनिराळ्या प्रकाराची औषधे एकदम घेतल्यामुळे त्यांच्यात रिएक्शन होऊन झाला . त्याच्या जवळच्या मित्र आणी नातलग परिवाराच्या मते त्याच्या घटस्फोटामुळे तो व्यथित झाला होता पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलीचा ताबा आपल्याकडून जाणार यामुळे तो निराश होता .त्यामुळे त्याने निरनिराळ्या प्रकारची औषधे एकदम घेऊन आत्महत्या केली असही काही लोकांचं म्हणणं आहे .
                   
               त्याच्या मृत्यू विषयी आणखी एक गूढ कारण असल्याची चर्चाही होत असते .त्याच्या शुटिंग डायरीत असलेल्या नोंदींवरुन असं जाणवतं की डार्क नाईट साठी तो खूप मेहनत घेत होता .पराकोटीची नकारार्थी असलेल्या ह्या भूमिकेचा नकारार्थीपणा आपल्या अभिनयात उतरावा यासाठी तो स्वत:ला खोलीत बंद करून घेत असे. बहुदा त्याच्या व्यक्तिमत्वावर जोकरने आपला प्रभाव सोडला असावा आणी तो निराशेच्या गर्तेत रुतत गेला असावा असंही त्याच्या जवळच्या लोकांचं मत आहे. या मताला  आधार  म्हणजे डार्क नाईट च्या शुटिंग डायरीत शुटींग संपल्यानंतर  शेवटच्या पानावरत्याने खरडलेले दोन शब्द होते GOOD BYE .या शब्दांनी त्याच्या मृत्यू बद्दल असलेलं गुढ आणखीच गडद झालं.
              कारण काहिही असो एका उत्कृष्ट अभिनेत्याला जग मुकलं .हॉलीवूड मध्ये त्याच्या पूर्वी अनेकांनी जोकर साकारला आहे पण त्याच्या एवढी उंची कुणालाच गाठता आली नाही. जेव्हा जेव्हा हॉलीवूड मध्ये उत्कृष्ट खलनायक कोण असा प्रश्न येईल तेव्हा त्या यादीत लेजरने साकारलेला जोकरचं स्थान खूप वरचं असेल आणी त्याच्या चाहत्यांच्या हृदयातही त्याच स्थान अढळ राहील ...!!


                                                                                          धन्यवाद  

No comments:

Post a Comment